india

डिझेलवरच्या बस होणार ई बस

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) जुन्या डिझेलवरील व सीएनजीवरील बस विजेवर चालणाऱ्या ई बसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. से रूपांतर करणारी पीएमपी ही देशातील पहिलीच संस्था आहे,’ अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी दिली.

पुणे पर्यायी इंधन परिषदेत आयोजित ‘झिरो इमिशन फ्लिट्स अँड पब्लिक ट्रान्सपोर्ट’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. मिश्रा यांच्यासह बाउन्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल जी., अॅमेझॉनच्या पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख स्मृती शर्मा, ग्रीन सेलचे सीएफओ सुमीत मित्तल आणि अल्टिग्रीन प्रपोल्शन लॅबचे बिझनेस हेड देवाशिष मित्रा या परिसंवादात सहभागी झाले होते. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे (डब्ल्यूआरआय) व्यवस्थापक रोहन राव आणि सल्लागार कौस्तव गोसावी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

‘पीएमपीने डिझेलवरील बसचा वापर बंद केला आहे. या बसचे ई बसमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी काही बस तयार झाल्या असून त्याला ‘एआरएआय’ व ‘सीआयआरटी’ या नियामक संस्थांची मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येईल. या बस किमान सात-आठ वर्ष वापरता येतील,’असे मिश्रा यांनी सांगितले.

‘मेट्रो पीएमपीची भागीदार’

‘पुणे मेट्रोची सेवा नुकतीच सुरू झाली आहे. कालांतराने मेट्रोच्या शहराच्या अन्य भागातही विस्तार होईल. पीएमपी मेट्रोकडे एक स्पर्धक म्हणून न पाहता भागीदार म्हणून पाहात आहे. येत्या काळात मेट्रोसाठी फीडर सेवा देण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी ३०० ई बसचा वापर करण्याचे उद्दिष्ट आहे,’ असेही मिश्रा म्हणाले.

देशातील सर्वांत मोठा ताफा

‘पीएमपीच्या ताफ्यात सध्या २९० ई-बस आहेत. तीन महिन्यांत ही संख्या ६५०वर जाईल. त्या वेळी पीएमपीकडील ई-बस ताफा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सर्वाधिक ताफा ठरेल. सध्या मुंबईत ‘बेस्ट’च्या ताफ्यात ३८६ ई-बसचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button