देश

‘माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, हे किडे मला…’; जाहीर सभेत शिंदेंच्या उमेदवाराचं विधान

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमधील अंतर्गत धूसपूस अनेकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे. केवळ पक्षांचे धोरणात्मक निर्णय नाही तर अनेक ठिकाणी नेत्यांमधील मतभेद समोर येताना दिसत आहेत. त्यामुळेच आपल्या मित्रपक्षातील नेत्यांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसत आहेत. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधील आमदार आणि नेते अब्दुल सत्तार यांचं असेच एक विधान चर्चेत आहे.

भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका
अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातील अजिंठा येथील एका जाहीर सभेमध्ये बोलताना सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे माजी खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे खास हिंदीत डायलॉगबाजीच्या शैलीत रावसाहेब दानवेंवर निशाणा साधताना सत्तार यांनी थेट मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सत्तार नेमकं काय म्हणाले?
अंजठामधील जाहीर सभेत जमलेल्या नागरिकांसमोर भाषण देताना सत्तार यांनी, “जब मै मुख्यमंत्री बदलने की ताकद रखता हू तो ये किडे मकोडे मुझे क्या करने वाले है? महाराष्ट्र मे जो गिने चूने पाच लीडर है उस्मे मेरा नाम है! कुछ लोगो को उसकी भी जलौसी होती है!” असं विधान केलं. सत्तार यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेमधील बंडामध्ये एकनाथ शिंदेंची साथ दिली होती. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे तत्कालीन सरकार कोसळलं होतं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यावरुनच सत्तार यांनी आपण मुख्यमंत्री बदलू शकतो इतके शक्तीशाली असल्याचा संदर्भ जोडला आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते खालच्या पातळीवर येऊन जातीपातीवर मते मागत आहेत, असा आरोप सत्तार यांनी केला. तसेच मुख्यमंत्री बदलण्याची ताकद माझ्यात आहे असं म्हणतानाच मी मुख्यमंत्री बदलू शकतो तर हे किड्या मुंग्यासारखे लोक मला काय करणार? असा सवाल सत्तार यांनी उपस्थित केला. “मी गेला 25 वर्षांमध्ये कोटी रुपयांची काम केलेले आहेत, विकास कामे कोण करतंय त्याला मतदान करा,” असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीची भूमिका
दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरुन कुरघोडी सुरु असतानाच भाजपाचं संकल्पपत्र जाहीर करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना, निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष एकत्र बसून मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भात सहमतीने निर्णय घेतील असं सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button