Vasant More: राज ठाकरेंच्या भेटीत समाधान झालं नाही तर?, वसंत मोरे पुण्यातून निघताना म्हणाले….
पुणे:राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे चर्चेत आलेले पुणे मनसेचे माजी शहाराध्यक्ष वसंत मोरे सोमवारी ‘शिवतीर्थ’वर हजेरी लावणार आहेत. सकाळी साधारण ११ वाजताच्या सुमारास वसंत मोरे (Vasant More) हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला पोहोचतील. वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे ‘शिवतीर्थ’वरील आजच्या बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या भेटीपूर्वी पुण्यातून निघताना वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी प्रसारमाध्यमांनी, राज ठाकरे यांच्यासोबतच्या आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाहीतर काय कराल?, असा प्रश्न वसंत मोरे यांना विचारला. यावर वसंत मोरे यांनी म्हटले की, राजसाहेब ठाकरे हे विचारांचा अथांग सागर आहेत. त्यामुळे माझ्या सर्व शंका-कुशंकांचे निरसन होईल, याची मला खात्री असल्याचा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला. आज पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्यासोबत येण्यासाठी आग्रही होते. मात्र, मी ‘शिवतीर्थ’वर एकटाच जाईन, असे त्यांना सांगितले. तरीही काहीजण हट्टाने माझ्यासोबत येत आहेत. आता या अडचणीतून राजसाहेब काहीतरी मार्ग काढतील, असे वसंत मोरे यांनी म्हटले.माझा राज ठाकरे किंवा मनसेवर कोणताही राग नाही. मी माझी अडचण राजसाहेबांना बोलून दाखवेन. फक्त माझाच प्रभाग नाही तर हडपसर परिसराचा विचार केला तर बऱ्याच अडचणी येऊ शकतात. मी माझी अडचण राज ठाकरे यांना बोलून दाखवेन. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडली होती. मी पक्षातून बाहेर गेलेलोच नाही. त्यामुळे राज ठाकरे माझी मनधरणी करतील, असा प्रश्नच येत नाही. थोडीफार नाराजी आहे. पण शहरातील काही पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात अनेक वाद होत आहेत. या सगळ्या गोष्टी संधी मिळाल्यास मी राज ठाकरे यांच्या कानावर घालेन. मला खात्री आहे की, माझे समाधान होईल. मी काहीच ठरवेलेले नाही. मी पक्ष सोडण्याचा कोणताही विचारही केलेला नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.