देश

Corona Vaccination : महापौर किशोरी पेडणेकर ‘द ललित’मध्ये दाखल; लसीकरणाच्या पॅकेजसंदर्भातील चौकशीतून महत्त्वाचा खुलासा

मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. पण, मुंबईसह अनेक ठिकाणी लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे आले. अशातच मोठ्या हॉटेल्सच्या लसीकरण पॅकेजनं सर्वांच्या भुवया उंचावल्या. काही हॉटेल्सकडून आपल्या विशेष पॅकेजमध्ये कोरोना लसही दिली जात होती, अशा प्रकारे लस देणाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना दिले आहेत. पॅकेजेसमध्ये लसीकरणाची ऑफर देणं म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे, त्यामुळे अशा हॉटेल्सनी हे तातडीने थांबवावं असे निर्देश केंद्रानं दिले आहेत.

अनेक हॉटेल्सनी त्यांच्या पॅकेजमध्ये लस देण्याच्या ऑफरही दिल्या, पण हे नियमबाह्य असल्याचं म्हणत आता केंद्रानं अशा प्रकारे लस देणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, मुंबईतील द ललित या हॉटेलकडून 3500 रुपयांच्या पॅकेजमध्ये लस दिली जात असल्याची चर्चा सुरु होती. ही चर्चा कानी येताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चौकशी करण्यासाठी थेट ‘द ललित’ गाठलं.

दर दिवसाला इथं 500 लोकांना लस देण्यात आल्याची बाब समोर आल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. क्रिटीकेअर या रुग्णालयानं केंद्राकडून परवानगी घेतली असल्याची बाबही त्यांनी प्रकाशझोतात आणली. ‘द ललित’मध्ये गेलं असता तिथं फ्रिजमध्ये कोवॅक्सिन लस सापडली. पण, हा फ्रिज सर्वसाधारण फ्रिज असल्याचं म्हणत लसींची साठवण करण्यासाठी योग्य तापमान असणारा फ्रिज नाही अशी शक्यता व्यक्त करत यामुळं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा शब्दांत त्यांनी सर्वांना सावध केलं.

आपण लस घेतली असं इथं लस घेतलेल्यांना समाधान वाटेल, पण त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. ‘द ललित’मध्ये येणाऱ्या नागरिकांना लस देऊन इथे ठेवलं जातं, त्यानंतर काही अडचणीची बाब दिसल्यास, रुग्णाला ताप वगैरे आल्यास डॉक्टरांना बोलवलं जातं. सध्या कोवॅक्सिन पालिकेच्या अनेक केंद्रांवर मिळत नाहीये, पण कॉर्पोरेट क्षेत्रांतील लसीकरणास केंद्र परवानगी देत असेल तर ही बाब लक्ष देण्याजोगी आहे, यावर त्यांनी जोर दिला.

ललित हॉटेलला दोष लावणं योग्य आहे का?
आपण सर्वांना कोविशील्ड आणि कोवॅक्सिन पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफतच दिली जात आहे. इथं क्रिटीकेअर रुग्णालयाने फ्रँचायझी घेतली असून, ललित हॉटेलची जागा घेतली आहे. यात ललित हॉटेलचा फारसा हात नाही. पण, इथं लस साठवण क्षमतेबाबत मात्र साशंकता आहे, त्यामुळं याबाबतची तपासणी तातडीनं केली जाणार असून, क्रिटीकेअर रुग्णालयाकडे याची चौकशी केली जाणार आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button