देश

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी पाठवलेलं गडचिरोलीतील लाकूड 1000 वर्षांपर्यंत टिकणार, ऊन-पाऊस अन् किडीचा प्रभाव नसेल

रामनवमीच्या एक दिवस आधीच चंद्रपुरात जणू अयोध्या नगरी अवतरल्याचं दिसून आलं. चंद्रपूर ते बल्लारपूर या दोन शहरांमध्ये सगळं वातावरण राममय झालं होतं. निमित्त होतं काष्ठ पूजेचं. अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर होणार आहे आणि विशेष म्हणजे या साठी आपल्या राज्यातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची निवड कऱण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वनविकास महामंडळाला हे सागवान पुरवण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्टने विनंती केली आणि त्याप्रमाणे आलापल्लीच्या जंगलातील अतिशय उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी निवडण्यात आलं. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे 1992 च्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात कारसेवक म्हणून सामील झाले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा कर्तव्यपूर्ती सोबतच अतिशय भावनिक विषय झालाय.

गडचिरोलीतील सागवानाचं वैशिष्ट काय?
– या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होत नाही.
– पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते.
– या सागवानात टेक्टॉनीन हा ऑइल कन्टेन्ट खूप जास्त आहे, त्यामुळे याला कीड लागत नाही आणि लाकडात खूप चमक असते.
– राममंदिरासाठी निवडण्यात आलेली सागाची झाडं किमान 80 वर्षांची आहेत. त्यामुळे लाकडात ग्रेन्सची संख्या जास्त आहे, यामुळे लाकडाला विशिष्ट प्रकारचा ब्राऊन रंग येतो आणि हे लाकूड नक्षीकाम केल्यावर खूप सुंदर दिसतं.
– हे सर्व लाकूड नॅचरल फॉरेस्टमधील असल्याने याला कीड लागत नाही आणि हे लाकूड खूप जीवट असतं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीतून प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी लाकडं पाठवण्याची संधी मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद आणि समाधान झाला असल्याची भावना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. 1992 मध्ये कार सेवक म्हणून राम मंदिरासाठी लढलो होतो. आज वनमंत्री म्हणून लाकडं पाठवण्याची संधी मिळाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

राम मंदिरासाठी जाणारं लाकूड ग्रेड थ्रीचे सागवान आहे. हे भारतातील उत्कृष्ट सागवान असून राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने आलापल्लीचे सागवान निवडण्यापूर्वी डेहराडून मधील राष्ट्रीय वन संशोधन संस्थेकडून देशभरातील सागवान लाकडाची तपासणी केली होती. त्यामध्ये गडचिरोलीचे सागवान उत्कृष्ट निघाले. त्यामुळे त्याची निवड करण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर हे 1000 वर्षे टिकेल असं भव्य दिव्य आणि मजबूत बांधलं जात आहे. त्या मंदिरातील विविध दारं आणि खांबांमध्ये वापरला जाणारा लाकूड ही तेवढीच मजबूत असायला हवीत. म्हणून गडचिरोलीतलं सर्वोत्कृष्ट लाकूड निवडलं आहे. या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होणार नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते असे त्याचे वैशिष्ट्य असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे रामाच्या मंदिरात 1000 वर्षांपर्यंत हे लाकूडही टिकेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

सागवानाच्या लाकडाचं काष्ठ पूजन आणि शोभायात्रा
अयोध्येतील राममंदिराच्या निर्माणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील सागवान आज पाठवण्यात येत आहे. या सागवान लाकडांचं विधिवत काष्ठ पूजन करून त्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. बल्लारपूर शहरातील काटा घर परिसरातून या शोभायात्रेला सुरुवात होणार असून यासाठी बल्लारपूर शहरात जय्यत तयारी केली जात आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी आणि गुढी उभारून शोभायात्रेचा हा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण बल्लारपूर शहरात उत्साही वातावरण तयार झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button