देश

‘रानकवी’ काळाच्या पडद्याआड! ना. धों. महानोर यांचं निधन

महाराष्ट्राला पडलेलं एक सुरेख निसर्गस्वप्न अशी ज्यांची ओळख करून दिली जाते अशा ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. गुरुवारी, (3 ऑगस्ट 2023) पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांदरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनासमयी ते 80 वर्षांचे होते.

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले . मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

एकाहून एक सरस गीतरचनांसाठी महानोरांनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांची अनेक गीतं आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button