देश

Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी अलीकडे केलेल्या काही वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. या वादामुळे शिंदे गट आणि भाजपचे नेते एकमेकांना भिडले होते. त्यामुळे भविष्यात या वादाचा वणवा पुन्हा भडकण्यापूर्वीच शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, या कारवाईचा नेमका मुहूर्त कधी, हे निश्चित झाले नव्हते. परंतु, नव्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालापूर्वीच शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर यांच्याबाबत फैसला होऊ शकतो. कीर्तिकर यांच्यावरील कारवाईचा निर्णय २-३ दिवसांत होईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गजानन कीर्तिकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची कठोर कारवाई करणार की त्यांना काही काळासाठी निलंबित करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नेमका वाद काय?
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले होते. यामध्ये वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. मात्र, मतदान संपताच शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांनी माझा मुलगा अमोल जिंकला तर वडील म्हणून मला आनंद होईल, असे म्हटले होते. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे उमेदवार होते. मात्र, निवडणुकीत रवींद्र वायकर हरले काय किंवा जिंकले काय, यामध्ये माझा काय दोष? मी त्यांचा प्रचार करण्याचे काम केले आहे. वायकरांना विजयी करायचे की पराभूत हे मतदारांच्या हातात असल्याचे सांगत गजानन कीर्तिकर यांनी एकप्रकारे हात झटकले होते.

गजानन कीर्तिकर यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. याशिवाय,भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही कीर्तिकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. गजानन कीर्तिकर यांना त्यांचा मुलगा अमोलला निवडून आणायचे होते.त्यासाठी गजानन कीर्तिकर यांनी कट रचला होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना गजानन कीर्तिकर यांनी म्हटले होते की, कटकारस्थान करणे मला जमत नाही, ती सवय भाजपची आहे.

आनंदराव अडसूळांचाही इशारा
गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात एकाकी पडल्याचे चित्र असताना माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांच्या मदतीला धावून आले होते. अडसूळ यांनी गजानन कीर्तिकर यांची पाठराखण करत एकनाथ शिंदे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, कीर्तिकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button