देश

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

राज्यात आज गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं. गुढीपाडव्याला काढल्या जाणाऱ्या शोभायात्रांना यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत.

तुळजाभवानीच्या मंदिरावर गुढी उभारली
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आज गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधिवत पूजा करून पहाटे पाच वाजता तुळजाभवानीच्या मंदिरावर गुढी उभारण्यात आली. यानंतर आई तुळजाभवानीला अभिषेक पूजा घालण्यात आली . आज पाडव्या दिवशी आई तुळजाभवानीला शिवकालीन दागिने घातले जातात. त्यानंतर तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा मानली गेली. आई तुळजाभवानीचं हे रूप पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक आज तुळजापूर मध्ये येतात.

साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये सजलंय. 450 किलो शेवंती, गुलाबी कण्हेर, अष्टर, झेंडू आणि गुलाब फुले वापरून ही फुलांची आरास केलीय. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुढीपाडवा शोभायात्रेत सहभागी झाले. कोपिनेश्वर मंदिरातून निघालेली पालखी एकनाथ शिंदेंनी आपल्या खांद्यावरून वाहिली. त्यानंतर पालखी सोहळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली.

गिरगावात, डोंबिवलीत जोरदार शोभायात्रा
मुंबईत गिरगावातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. तर डोंबिवलीतही तोच उत्साह दिसत आहेत. डोंबिवलीत या शोभायात्रांना सुरुवात झाली होती. त्यामुळे यावर्षी डोंबिवलीतली शोभायात्रा वैशिष्ट्यपूर्ण अशी असणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीत गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. डोंबिवलीसह गिरगाव, ठाणे, गोरेगाव या भागातल्या शोभायात्रांही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन
मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने थोड्याच वेळात नाशिक शहरात शोभायात्रा काढण्यात आली आहे. नाशिकच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत महिला पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या आहे. लहान मुली देखील नऊवारी साडी नेसून, हाती लेझीम घेऊन सहभागी झाल्या होत्या.

नागपुरातही मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत

गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातही मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. नागपुरात तरुण तरुणी पारंपरीक वेषशुभेत शोभायात्रेत सहभागी झालेत..तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात 51 फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती केली जाणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक-गोडबोले याची या शोभायात्रेला विशेष उपस्थिती लावली होती. नागपुरातील शोभायात्रेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक या शोभायात्रेत उत्साहात सहभागी झाल्याने अधिकच उत्साह पाहायला मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button