देश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्याला जाणार, राम लल्लाचं दर्शन घेणार

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीनंतर डिसेंबरमधे अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दिवाळीनंतर अयोध्येला जाणार
कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांचं सपत्नीक स्वागत केलं. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं. तसंच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज ठाकरे यांना करण्यात आली. राज यांनीही हे निमंत्रण स्वीकारलं आहे. राज यांनी दिवाळी नंतर अयोध्येला जाण्याचा निर्णयही घेतल्याचं सांगितल जात आहे.

उत्तर भारतीयांबद्दल प्रेम
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गुरु माँ कांचन गिरीजी यांनी पत्रकार परिषद घेतली. हिंदू राष्ट्र व्हावं याबद्दल या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर भारतीय यांच्या बद्दल राज ठाकरे यांच्या मनात जे गैर समज आहेत ते दूर केले, राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबद्दल प्रेम आहे असं कांचन गिरीजी यांनी म्हटलं आहे.

डिसेंबर महिन्यात राज ठाकरे अयोध्येला जाण्याच्या विचारात आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करू असं सांगतानाच कांचन गिरीजी यांनी राज ठाकरे जे बोलतात ते करतात, देशाला अश्या लोकांची गरज आहे असं म्हटलं आहे. युपी बिहार मधील लोकांनी निश्चिंतपण महाराष्ट्रात राहावे, राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.

उत्तर भारतीयांबाबत कोणतेच समज गैरसमज नाहीत
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही हिंदूराष्ट्र हा भेटीचा अजेंडा होता असं म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रसाठी योग्य वाटतो. मध्यंतरी राज ठाकरे आयोध्याला जाणार होते पण कोरोनाची दुसरी लाट आली होती. अयोध्येतून अनेक लोकांनी राज ठाकरे यांना बोलावलं आहे, असं नांदगावकर यांनी म्हटलं. आजोबा, पणजोबांपासून हिंदुत्व राज ठाकरेंमध्ये भिनलेलं आहे, राज ठाकरे कणखर हिंदुत्व मांडू शकतात असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

उत्तर भारतीयाबाबत कोणतेच समज गैरसमज नव्हते ते माध्यमानी दाखवले, 23 तारखेला मनसेचा भांडुपला मेळावा आहे त्यात सगळी उत्तर राज ठाकरे यांच्या कडून मिळतील, असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूकांच्या आधी आणि नंतर आयोध्या दौरा केला होता. पण महाराष्ट्रात भाजापाबरोबर फारकत घेतल्यानंतर शिवसेना हिंदूत्वपासून लांब जात असल्याची ‘टिका विरोधकांकडून सुरू असताना आता राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनाभवनासमोर राज ठाकरेंचे पोस्टर ही बरेच काही सांगून जातं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button