केरळमध्ये पावसामुळे हाहाकार ; सहाजणांचा मृत्यू, 12 बेपत्ता

शनिवारी हवामानात अचानकच झालेल्या बदलांमुळं केरळमध्ये जोरदार पाऊस सुरु झाला. अतिवृष्टीमुळे इथं अनेक भागांमध्ये पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी पावसामुळं दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. या साऱ्यामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, जवळपास 12 जण बेपत्ता झाले आहेत.
केरळमध्ये पावसानं कहर माजवला असून, अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली गेली आहेत. काही भागांमध्ये रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. मोठमोठाली घरंही पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र समोर आलं आहे.
केरळमध्ये झालेल्या अतीमुसळधार पावसानंतर पठानमथिट्टामध्ये मनियार धरणाचे दरवाजे खोलण्यात आले. ज्यामुळं नजीकच्या भागामध्ये पाणी शिरलं. केरळमधील डोंगराळ भागात सैन्य आणि वायुदलाची पथकं मदतीसाठी पोहोचली आहेत. केरळ पट्ट्यामध्ये मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारप्रमाणेच रविवारीही इथं जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं केरळमधील नागरिकांमध्ये पावसाची दहशत पाहायला मिळत आहे.
केरळप्रमाणेच तामिळनाडूमध्येही चित्र काही वेगळं नाही. इथंही पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक जलप्रवाह दुप्पट वेगानं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंबंधीचे काही व्हिडीओही शेअर केले आहेत.