चिपळूणमध्ये भीषण पूरस्थिती, रेस्क्यू ऑपरेशनसाठी 2 हेलिकॉप्टर रवाना
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण शहर जलमय झालं आहे. मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर पाण्यात गेलं आहे. 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आल्याचं दिसून येत आहे. बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलंय. अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. तर चिपळूण शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये, छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूणमधील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.
रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस आणि कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आलेय. वशिष्ठी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड, भोगाळे, परशूराम नगर याबरोबरच खेड परिसरात पाणी वाढत आहे. रॉयल नगर तसंच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी आणि दुचाकी पाण्याखाली आहेत.
हायटाईड आणि अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती आहे असं जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिकेने 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं आहे. तर रत्नागिरी मधून 1, पोलीस विभागाकडील 1 आणि कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आलाय. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलंय. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीच्या पात्राचं पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलंय. आजूबाजूच्या शेतांमध्येही पाणी शिरलंय.
पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे (खेड साठी 1 आणि चिपळूण साठी 1) इथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. रेस्क्यू आँपरेशनसाठी 2 हेलिकाँपटर चिपळूण कडे रवाना झाले आहेत. NDRF ची टीमही काही वेळातच पोहचणार आहे. याशिवाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्राशकीय मदत पथकं चिपळूणकडे रवाना झाली आहेत.