खाद्य तेलानंतर सणासुदीच्या काळात कडधान्यांचे दर कडाडणार; केंद्राच्या निर्णयावर व्यापाऱ्यांची नाराजी
एकीकडे खाद्य तेलाचे दर गगनाला भिडत असताना तसेच त्यावर कसलेही नियंत्रण अद्याप आलेले नाहीत. मात्र केंद्र सरकारने कडधान्य साठा नियंत्रण कायदा लागू केल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांनी कडधान्ये खरेदी बंद केली आहे.
परिणामी येत्या काळात पुढील सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हमीभावापेक्षा डाळींचे दर वाढलेले नसतानाही केंद्र सरकारने 2 जुलै पासून लागू केलेला साठा नियंत्रण कायदा लागू केला आहे.
महाराष्ट्र सरकारने हा कायदा राज्यात लागू करू नये. तरंच आम्ही व्यापार करू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर लातूर येथील श्री ग्रेन सीड्स अँड ऑइल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग मुंदडा यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारने मोठ-मोठ्या मॉलचे दर पाहूनच व्यापाऱ्यांवर निर्बंध आणल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. जर अशीच परिस्थिती राहिली आणि व्यापाऱ्यांकडील माल संपल्यावर डाळींच्या भाववाढीचा भडका उडू शकतो अशी भीतीही मुंदडा यांनी व्यक केली आहे.
केंद्र सरकारने गेल्या वर्षीच शेतकरी कायदे संमत करताना जीवनावश्यक वस्तूंमधून डाळवर्गीय पिके वगळली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कडधान्यांचा साठा केला होता. आता व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठीच हा कायदा केला आहे का ? असा सवालही व्यापारी करू लागले आहेत.