देश

भाजपमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढवणार?, CBI चौकशीसाठी थेट अमित शहांना पाठवलं पत्र

परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर या मागणीवर आक्रमक भूमिका घेत आता भाजपने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

अधिक माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांच्याकडून हे पत्र पाठवण्यात आलं आहे. भाजपच्या या मागणीमुळे आता अजित पवार आणि अनिल परब यांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. खरंतर, परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता यामध्ये अजित पवार आणि अनिल परब यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे, असं या ठरावात म्हटलं होतं.

गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली होती. त्यानंतर आता थेट अमित शहा यांना पत्र पाठवलं असल्याने आता यावर पुढे काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 🌐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button