देश

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नका, नितेश राणेंचे पत्र!

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहे. परीक्षेला महिना शिल्लक असताना विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. दरम्यान भाजप मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिलंय. यात दहावी-बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून प्रवेश नाकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.  

दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींना बुरखा घालून परिक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून केली आहे. राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. कॉपीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे. 

काय म्हणाले नितेश राणे?

दहावी, बारावी परीक्षेत बुरखा घातलेल्या विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये असे नितेश राणे म्हणाले. माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे. असं लांगुलचालन चालणार नाही अशी भूमिका मी शिक्षण मंत्र्यांकडे मांडल्याचे नितेश राणे म्हणाले. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.  

लांगुलचालन आम्हाला मान्य नाही. हा निर्णय 2024 सालचा आहे. हे निर्णय रद्द करण्यासाठी मागणी केली. परिक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमकी तीच विद्यार्थीनी परीक्षेला आहे का? हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये, असे राणे यावेळी म्हणाले. नितेश राणेंच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. विशिष्ठ धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असं परिपत्रक काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा, असे ते यावेळी म्हणाले.

दोन शिफ्टमध्ये परीक्षा 

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षेचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल तर सामाजिक विज्ञान विषयाचा पेपर शेवटचा असेल. दहावीची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहेत. सकाळच्या शिफ्टची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर दुपारच्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. असे असले तरी काही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे.

हॉलतिकीट कसे डाउनलोड कराल? 

दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या वतीने हॉल तिकीट डाउनलोड करू शकते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या एसएससी हॉल तिकीट 2025 लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा. महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती विद्यार्थ्यांना वितरीत करा.अधिकृत नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी हॉल तिकीट 2025 मध्ये दुरुस्त्या करता येतील. विद्यार्थ्याचे नाव, आईचे लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मस्थान यासारख्या काही क्षेत्रात चुका असतील तर तुम्ही बदल करू शकता. दुरुस्त्या करण्यासाठी, उमेदवारांना विहित शुल्क भरावे लागेल. विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर सुधारित महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 ‘सुधारणा प्रवेशपत्र’ लिंकद्वारे डाउनलोड करता येईल. विषय किंवा माध्यमात बदल करण्यासाठी शाळांना थेट विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागेल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button